शेती हा आपल्या भारत देशातील प्रमुख व्यवसाय आहे. अलीकडील अहवालानुसार भारतातील सुमारे 65 टक्के कामगार हे शेती क्षेत्राशी निगडीत काम धंदे करत असल्याचे दिसून आले आहे.
शेती संबंधित व्यवसाय म्हणजेच शेतीला पूरक असणारे व्यवसाय (कृषी उद्योग माहिती) कोणते आहेत हे आपण आजच्या पोस्टमध्ये पाहणार आहोत.
शेतीपूरक व्यवसाय म्हणजे काय
शेतीपूरक व्यवसाय म्हणजे असे व्यवसाय ज्यात शेतीत पिकणाऱ्या कच्चा मालावर प्रक्रिया करून मानवाच्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या वस्तू तयार केल्या जातात. मानवाच्या आहारातील खाद्य पदार्थ तयार केले जातात. आयुर्वेदीक औषधे, पशुंसाठी खाद्य तयार केले जाते.
उदाहरणार्थ, धान्यांपासून ब्रेड, डाळ, विविध पीठे व पशुखाद्य, फुलांपासून हार, वनस्पतींपासून तेल, औषध, झाडू, फळांपासून ज्यूस व विविध पेये इत्यादी.
शेती अवजारे विक्री दुकान

शेतीसाठी विविध प्रकारच्या यत्रांचा व अवजारांचा वापर केला जातो. खुरपणी करण्यासाठी खुरपे, कोळपे, कीटकनाशके मारण्यासाठी फवारणी पंप, पाइप, इंजिन, मोटर, क्लिप, ठिबक सिंचन, पाने, स्क्रू ड्रायवर, असे विविध प्रकारचे साहित्य शेतकर्याला शेती करताना दररोज वापरावी लागतात.
त्यामुळे तुम्ही तुमच्या गावात किंवा जवळच्या तालुक्याच्या ठिकाणी, शहराच्या ठिकाणी शेती अवजारे विक्रीचे दुकान टाकून शेती अवजारे विक्रीचा चांगला व्यवसाय करू शकता.
कीटकनाशके, खते विक्री दुकान
पिकांच्या वाढीसाठी, पिकांवर येणारी कीड, वाळवी व रोग यांचा समूळ नाश करण्यासाठी विविध प्रकारची कीटकनाशके, औषधे यांचा वापर करावा लागतो, तसेच पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणार्या खतांचा वापर केला जातो.
जर तुम्हाला शेतीशी निगडीत एखादा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही कीटकनाशके, व खते विक्री दुकानासाठी आवश्यक असणारा परवाना काढून कीटकनाशके, खते विक्रीचे दुकान सुरू करू शकता.
मका भरडा उद्योग
मित्रांनो हा एक असा व्यवसाय आहे जो तुमच्या गावात चालू शकतो. ज्या परिसरात दुग्ध व्यवसाय आहे त्या परिसरात या व्यवसायाला मरण नाही.
कारण गायींना व म्हैसींना दूध वाढीसाठी एक उत्तम पोषक आहार म्हणून मकेचा भरडा खाऊ घातला जातो.
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल व जागा देखील कमी लागते. हा एक शेतीवर आधारित उद्योग आहे. तुम्ही तुमच्या आसपासच्या परिसरातील शेतकर्या कडून कच्चा माल मका धान्य विकत घेऊन हा व्यवसाय सुरू करू शकता.
या व्यवसायात अगदी माफक व योग्य दरात मकेचा भरडा दुग्ध व्यवसायिकांना विकून चांगला नफा मिळवता येईल.
खाद्य तेल उद्योग

तेल हा पदार्थ प्रत्येकाच्या घरातील किचनमध्ये सापडतो. वेवेगळ्या प्रकारचे खाद्य पदार्थ बनवताना शेंगदाणा, सूर्यफूल, तीळ, मोहरी तेलाचा वापर केला जातो.
हे विविध प्रकारचे खाद्य तेल तेल बियांपासून काढले जाते. आज बाजारात मिळणारे सोयाबीन तेल, व इतर खाद्य तेले ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ आढळते.
अशा भेसळ युक्त तेलामुळे अनेक प्रकारचे आजार लोकांना जडत आहेत. त्यामुळे तुम्ही जर शुद्ध लाकडी घाण्यापासून तयार केलेले तेल विकण्याचा व्यवसाय सुरू केला तर निश्चितच लोक तुमच्या कडून शुद्ध सेंद्रिय पद्धतीने, कोणतीही केमिकल प्रक्रिया न करता तयार केलेले तेल विकत घेतील.
आज मार्केटमध्ये लाकडी घाण्यापासून तयार केलेल्या खाद्य तेलाला प्रचंड मागणी आहे.
हे वाचा:
भाजीपाला निर्जलीकरण व्यवसाय
कोल्ड स्टोरेज व्यवसाय
डाळ मिल व्यवसाय

तूर, हरभरा, उडीद, मूगडाळ अशा अनेक डाळींची निर्मिती करून त्यांची स्थानिक व शहरी भागात विक्री करणे हे या व्यवसायाचे स्वरूप आहे. आज घरोघरी डाळीला प्रचंड मागणी आहे. जेवणातील भाजी बनवताना सर्रास डाळींचा वापर केला जातो.
तुमच्या आसपासच्या शेतकर्यांकडून तूर, हरभरा, उडीद, मूगडाळ अशा विविध प्रकारच्या कडधान्यांची खरेदी करता येते.
आज मार्केटमध्ये डाळ बनवणारी आधुनिक यंत्रे देखील उपलब्ध आहेत, ते यंत्र खरेदी करून तुम्ही तुमच्या घरातील मोकळ्या जागेत डाळ मिल बसवून व्यवसाय सुरू करू शकता.
शेतीत वापरली जाणारी अवजारे दुरूस्तीचे वर्कशॉप
शेतीत लागणार्या साधनांची सतत तोड मोड होत असते, अशावेळी त्यांना वेल्डिंग करून जोडावे लागते. काही साहित्य जसे विळा, खुरपे आणि कुर्हाड यांना सतत धार लावावी लागते.
शेतीत काम करणार्या कामगारांना अशी शेती संबधित साधने दुरूस्ती व धार लावण्यासाठी शहरात जावे लागते त्यामुळे त्यांचा खूप वेळ वाया जातो.
जर तुम्ही त्यांची ही अडचण लक्षात घेऊन जर शेती विषयक साधने दुरूस्तीचे व धार लावण्याचा व्यवसाय जर सुरू केला तर तुम्हाला तुमच्या गावातच काम धंदा मिळेल.
कृषि सल्ला अकॅडेमी

तुमचे शिक्षण शेती क्षेत्रातून झाले असेल किंवा तुम्ही एक यशस्वी शेतकरी असाल तर शेतकरी तुमच्याकडून शेती सल्ला घ्यायला उत्सुक असतात.
त्यामुळे ही संधि ओळखून तुम्ही शेतकर्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करून स्वतचा व्यवसाय सुरू करू शकता.
यामध्ये तुम्ही शेतकर्यांना कोणत्या ऋतूमध्ये कोणती पिके घ्यावीत, कोणत्या पिकांच्या रोगांवर कोणती फवारणी करावी, कोणते वाण चांगले आहे, फळांची लागवड कशी करावी असे अनेक शेतीसंबधी सल्ले देऊ शकता. तुम्ही हे कृषि सल्ला केंद्र गावालगतच्या शहरात किंवा खेड्यात देखील सुरू करू शकता.
शेत कामगार पुरवठा करणे
शेत कामगार पुरवठा करणे ही एक व्यवसायाची नवीन संकल्पना आहे परंतु ती चांगली काम करते. तुम्हाला तर माहीतच आहे कि ऐन सुगीच्या वेळी शेतकामगार ज्यांना आपण शेतमजुर म्हणतो ते शेतकामासाठी मिळत नाहीत.
हंगाम बाजारीचा असू द्या अथवा ज्वारीचा असू द्या, अथवा गहू काढणीचा असू द्या या सर्व हंगामध्ये कामगार जास्त मजुरी देऊन देखील मिळत नाहीत. यामध्ये तुम्हाला शेतमजूर कामगारांचा एक गट तयार करायचा आहे.
तुमचा एक शेतमजुरांचा गट आहे असे शेतकर्यांना माहिती झाल्यास शेतकरी तुमच्याशी संपर्क साधून तुमच्या ग्रुपला काम देतील.
तुम्ही तुमच्या ग्रुपचा व्हॉटसप ग्रुप तयार करून तुमच्या कामाची तुमच्या ग्रुपची माहिती लोकांना देऊ शकता.
सोशल मीडियावरून तुम्हाला आणखी कामे मिळतील. आता तुम्ही म्हणाल यातून मी कसा व्यवसाय करू शकतो. तर तुम्ही ग्रुपची ने आण करण्यासाठी स्वत:चे वाहन भाड्याने लावू शकता यात तुम्हाला तुमच्या वाहनाचे भाडे देखील मिळून जाईल.
आता दुसरा विषय राहिला तो म्हणजे कामगारामागे मिळणार्या कमिशनचा तर तुम्ही प्रत्येक कामगारामागे 30 ते 50 रुपये कमिशन शेतक्र्याकडून वसूल करू शकता.
धान्य मळणी यंत्र चालवणे
गहू करणे, बाजरी करणे, ज्वारी करणे आणि मूग करणे अशी विविध पिके मळणी करताना धान्य मळणी यंत्राचा वापर केला जातो. सुगीच्या वेळी धान्य मळणी यंत्राचा शेतकर्यांना तुटवडा भासतो. त्यामुळे काही वेळा धान्य मळणी करण्यासाठी खूप वेळ लागतो.
शेतकरी वेळेत धान्य मळणी झाली नाहीतर वैतागून जातात. शेतकर्याची ही अडचण पाहता किंवा सुगीच्या वेळी या यंत्रांना असणारी मागणी पाहता तुम्ही मळणी यंत्र खरेदी करून तुमचा व्यवसाय चालू करू शकता.
यामध्ये सुरूवातीला तुम्हाला फक्त चांगल्या कंपनीची अद्ययात धान्य मळणी यंत्र खरेदी करायचे आहे. हळू हळू जास्तीत शेतकर्यांना तुमचा संपर्क क्रमांक मिळेल आणि तुमचा व्यवसाय जोमात चालेल.
ट्रॅक्टर चालवणे
शेतीत नांगरणी करणे, पेरणी करणे, फवारणी करणे, जमिनीची मशागत करणे अशा विविध कामासाठी ट्रॅक्टर या यंत्राचा वापर केला जातो.
पूर्वी ट्रॅक्टर ऐवजी शेतीची मशागत करण्यासाठी बैलांचा वापर केला जात असे, तसेच लाकडी नांगर, लाकडी अवजारांचा वापर केला जात असे परंतु अलीकडे ट्रॅक्टरसारखे अद्ययावत यंत्र वापरुन शेती केली जाते.
शेतीत माती भरणे असेल, चारी काढणे, बांधाना माती लावणे, मुरूम वाहतूक करणे, शेतमाल वाहतूक करणे अशी अनेक कामे ट्रॅक्टरच्या मदतीने केली जातात, त्यामुळे ट्रॅक्टर हे यंत्र शेती व्यवसायातील अविभाज्य घटक बनला आहे.
सध्या ट्रॅक्टर शिवाय शेती हा विचारच केला जाऊ शकत नाही, इतके ट्रॅक्टरचे महत्व आहे.
मार्केटमध्ये विविध कंपन्यांचे मिनी ट्रॅक्टर, पुढच्या फळीचे ट्रॅक्टर असे विविध ट्रॅक्टर तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्ही तुमच्या परिसरातील शेतकर्यांच्या मागणी नुसार ट्रॅक्टर खरेदी करून व्यवसाय सुरू ठेऊ शकता.
Conclusion (निष्कर्ष)
शेती क्षेत्राशी निगडीत असणारे व्यवसाय, शेतीवर आधारित व्यवसाय आणि शेती जोड धंदा व्यवसाय हे पुर्णपणे शेतीवरच अवलंबून असतात. शेतीतीलच कच्च्या मालाचा पुरवठा या व्यवसायांना होत असतो.
जर तुमच्या परिसरात ही शेतीवर आधारित चालणार्या उद्योगांची कमतरता भासत असेल तर ही तुमच्यासाठी एक नवी संधि ठरू शकते. यावरून तुमच्या शेतीक्षेत्र परिसराचा अभ्यास करून तुम्ही तुमचा व्यवसाय निवडू शकता.

Uday Waghmare is the author of this blog. He is passionate about writing in the field of business and is trying his best to provide business-related information in the Marathi language on this blog.