सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य माहिती

सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य आणि सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक कार्य याविषयी सखोल माहिती पाहूया.

सावित्रीबाईंनी स्त्रिशिक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये केलेले कार्य अभिमानास्पदच आहे. त्यांच्या या महान कार्यामुळे महाराष्ट्रातील असंख्य स्त्रिवर्गाच्या सावित्रीबाई प्रेरणा बनल्या आहेत.

संपूर्ण स्त्रि वर्गाला गर्व व आदर्श वाटावा असेच त्यांचे कार्य आहे. सामाजिक जीवनातील प्रत्येक चळवळी मागे सावित्रीबाईंचे फार मोठे योगदान आहे.

19 व्या शतकात आपल्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवणारी एकमेव क्रांतीकारी स्त्रि अशी त्यांची ओळख आहे.

सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य

महिला सेवा मंडळ (1852)

स्त्रियांना शिक्षणाशिवाय आणखी काहीतरी हवे आहे हे सावित्रीबाईंनी चांगले ओळखले होते.

स्त्री शिक्षणाबरोबर स्त्रियांना समाजात महत्त्वाचे व मानाचे स्थान मिळावे, स्त्रियांना मोकळा श्वास घेता यावा म्हणून त्यांच्यासाठी काहीतरी करता यावे या उद्देशाने सावित्रीबाई फुले यांनी इसवी सन 1852 साली देशातील पहिली संस्था महिला सेवा मंडळाची स्थापना केली.

सावित्रीबाईंनी या संस्थेचे सचिव पद आपल्या हाती घेतले होते. महिला सेवा मंडळाची स्थापना करून त्याकाळी सावित्रीबाई फुले यांनी समाजक्रांतीची जणू मुहूर्तमेढ रोवली होती.

समाजकार्य करत असताना सावित्रीबाई फुले यांना प्रचंड त्रास देण्यात आला. तरीही त्या थांबल्या नाहीत. त्यांनी आपले सामाजिक कार्य जोमाने चालू ठेवले.

लोकांनी त्यांच्या अंगावर शेणाचे गोळे फेकले परंतु स्त्रियांच्या कर्तृत्वाला गती व दिशा देण्याचे कार्य ही संस्था करत होती.

धार्मिक रूढी परंपरेला विरोध

स्त्रियांनी त्याकाळी धार्मिक रूढी व परंपरेने अनेक वृत्तवैकल्ये करावे लागत. विधवा स्त्रियांचे केशवपन करणे, सतीची चाल, लहान वयातच मुलींचा होणारा बालविवाह अशा अनेक चाली रीतीने स्त्रियांचे जीवन नरकाहून भयानक केले होते.

या सर्व चालीरीती विरुद्ध सावित्रीबाईंनी आवाज उठवला. यातून स्त्रियांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.

बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापना (28 जानेवारी 1853)

सावित्रीबाईंनी 28 जानेवारी 1853 साली बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. त्याकाळी लहान वयातील मुलींचे वृद्ध पुरुषाशी विवाह केले जात.

वृद्ध पुरुषाशी विवाह केल्याने त्या कमी वयातच विधवा होत. बालविधवा स्त्रियांवर अत्याचाराचे प्रमाण वाढले होते. यातूनच एखाद्या बालविधवेला मूल झाल्यास त्याची जिवंतपणे हत्या केली जाई.

या बालहत्या प्रतिबंधक गृहाद्वारे बालविधवा महिलांना पीडित स्त्रियांना आधार दिला जाई.

विधवांचे मुंडन थांबवले

त्याकाळी एखाद्या मुलीचा पती मरण पावल्यास त्या विधवेचे मुंडन केले जात. तिचे मंगळसूत्र तोडून टाकले जाई. तिच्या कपाळावरचे कुंकू पुसले जाई आणि लगेचच न्हाव्याला बोलावून तिच्या डोक्यावरचे केस काढले जात.

तीचे केस काढताना तिला प्रचंड वेदना होत. अक्षरशा तिचे डोके रक्ताने माखत असे. अशा बालविधवांचा होणारा शारीरिक व मानसिक त्रास थांबवण्यासाठी त्यांनी पुण्यामधील न्हाव्यांची बैठक बोलावून हे पाप थांबवण्यासाठी विनंती केली.

अखेर न्हावी समाजाने आपण हे पाप करत आहोत हे मान्य केले व त्यांनी हे काम थांबवले. कारण ब्राह्मण आपणास हे पाप करायला भाग पाडत आहेत हे न्हाव्यांनी ओळखले.

ब्राह्मणांनी विधवा महिलांचे मुंडण करणे हि चाल बंद करावी याकरिता सर्व न्हावी समाजाने सर्व ब्राह्मणांच्या हजामती करण्यावर बहिष्कार घातला. अखेर ब्राह्मणांनी न्हाव्यांच्या या संपाला शरण जाऊन केशवपणाची चाल बंद केली.

विधवा पुनर्विवाह घडवून आणणारी सभा स्थापन

त्याकाळच्या समाज व्यवस्थेत एका पुरुषाला अनेक विवाह करण्याची परवानगी होती. परंतु एखाद्या विवाह झालेल्या मुलीचा पती मेल्यास तिला पुन्हा विवाह करण्याची मुभा नव्हती.

लहान वयातच पती वारल्यामुळे त्यांना आयुष्यभर फक्त विधवा म्हणूनच राहावे लागत असे. कधी कधी त्यांच्यावर अत्याचार होत.

यातून त्यांना मूल ही होत असे. अशावेळी समाज त्यांना वाळीत टाकत. बाल विधवांचे होत असणारे हाल पाहून सावित्रीबाई यांनी विधवा पुनर्विवाह घडवून आणणारी सभेची स्थापना केली. यातून बाल विधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात.

सत्यशोधक समाजाच्या स्थापनेनंतर सावित्रीबाईंचे कार्य

या समाजाने लग्न लावणारा पुरोहित नाकारला. हुंड्याशिवाय लग्न लावण्याची कामगिरी हाती घेतली. या समाजामार्फत पहिला विवाह 25 डिसेंबर 1873 रोजी घडवून आणण्यात आला.

सावित्रीबाईंनी हा विवाह लावताना स्वतः पुढाकार घेतला होता. त्यांचे हे क्रांतिकारी कार्य पाहून त्याकाळच्या समाज व्यवस्थेने त्यांना प्रचंड त्रास दिला.

विधवेचा पहिला पुनर्विवाह (विधवा विवाह संस्था)

सावित्रीबाईंनी शेणवी जातीतील विधवेचा पहिला पुनर्विवाह घडवून आणला. विधवा मुलींना पुरुषांप्रमाणे पुन्हा विवाह करता यावा, त्यांचे जीवन घडावे या उद्देशाने विधवा विवाह संस्थेची सावित्रीबाईंनी स्थापना केली.

1877 सालच्या दुष्काळात सावित्रीबाईंची मदत

1877 साली खूप मोठा दुष्काळ पडला होता. जनतेचे खाण्यापिण्याची वांदे झाले होते. लोक अन्न व पाण्याविना तडफडू लागले होते. अशा परिस्थितीमध्ये सावित्रीबाई फुले सर्वसामान्यांच्या माई म्हणून समोर आल्या.

गरीब सर्वसामान्य लोकांना पोटभर अन्न मिळावे याकरता त्यांनी गावोगावी फिरून निधी जमवला. गावोगावी मदत केंद्र उभारली.

स्वतःच्या हाताने जेवण बनवून दिन दुबळ्यांना जेवण भरवले. महाराष्ट्रात ठिकठिकाणी एकूण 52 अन्नछत्रालये चालू केली.

1897 ची प्लेगची साथ आणि सावित्रीबाईंचे समाजकार्य

1897 साली प्लेगची साथ आली एका पाठो पाठ एक लोक मरण पावू लागले होते. सर्वत्र साथीने थैमान घातले होते. संपूर्ण कुटुंबच साथीने मरण पावत.

अशी ही भयानक प्लेगची साथ होती. सावित्रीबाई या काळात सर्वसामान्य लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. गोरगरिबांची सेवा करू लागल्या.

प्लेगच्या साथीवेळी सावित्रीबाईंनी आपल्या दत्तक पुत्राला तातडीने बोलावून घेतले आणि त्याच्या दवाखान्यात सर्वसामान्यांवर उपचार चालू केले.

हीच प्लेगची साथ सावित्रीबाईंचा कर्दनकाळ ठरली. गरिबांची सेवा करत असताना त्यांना संसर्गजन्य प्लेगची लागण झाली आणि 10 मार्च 1897 रोजी त्यांचा मृत्यू झाला.

सावित्रीबाईंचे शैक्षणिक कार्य

सावित्रीबाई फुले निरक्षर होत्या. जोतीरावांशी त्यांचा विवाह झाल्यानंतर जोतीरावांनी स्वतः त्यांना साक्षर केले. अक्षर ओळख करून दिली.

ज्योतीरावांनी इसवी सन 1848 मध्ये पुणे येथे भिडे या ब्राह्मण गृहस्थाच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. या शाळेत सावित्रीबाई फुले स्त्रिशिक्षिका म्हणून काम करत. सामाजिक बंधने, रूढी आणि परंपरा तोडून सावित्रीबाईंनी शैक्षणिक कार्यात प्रवेश केला.

सावित्रीबाईंना शैक्षणिक कार्य चालू ठेवत असताना ज्योतिराव फुलेंची मोठी साथ मिळाली. स्त्री शिक्षण आणि दलित उद्धारक कार्यात सावित्रीबाईंना ज्योतिरावांनी प्रेरणा व मदत देण्याचे मान्य केले.

पाहता पाहता या शाळांची संख्या 18 वर पोहोचली. पुण्याच्या बाहेरही शाळा उघडल्या जाऊ लागल्या. जास्तीत जास्त मुली शाळेत याव्या त्याकरिता सावित्रीबाई महारवाड्यात जाऊन लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत असत.

शिक्षणाविषयी त्यांच्यामध्ये ओढ निर्माण करत असत. सावित्रीबाईंनी या शैक्षणिक कार्यामुळे भारताच्या प्रथम महिला शिक्षिका होण्याचा मान मिळवला. इसवी सन 1849 ते 1850 पर्यंत शाळांची संख्या 70 च्या वर पोहोचली.

सावित्रीबाई फुले स्वतः घरकाम करायच्या आणि सुनेला शिक्षणासाठी प्रोत्साहन द्यायच्या. अशा या सावित्रीबाई फुले शिक्षणास प्रोत्साहन देणाऱ्या होत्या.

सावित्रीबाई फुले आदर्श मुख्याध्यापिका, थोर समाजसेविका, गोरगरिबांच्या उद्धारक, शेतकऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या आणि पतीच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाचे कार्य पुढे नेणाऱ्या होत्या.

इतकेच नव्हे तर त्यांनी मानवतेसाठी अपार कष्ट घेतले. खेडोपाडी प्रबोधने केली. सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांसोबत सावित्रीबाई खेडोपाडी फिरत असत. त्याकाळी त्यांनी खेडोपाडी जाऊन सामाजिक धार्मिक जागृती केली. गावोगावी आंदोलने केली.

शैक्षणिक कार्यात समाज कंटकानी दिलेला त्रास

सावित्रीबाई शाळेत निघाल्या की लोक त्यांच्या अंगावर शेणाचे गोळे टाकत. अपशब्दांचा मारा करत असत. प्रसंगी दगड सुद्धा मारत असत.

सावित्रीबाईंच्या नातेवाईकांनी त्यांचे शैक्षणिक कार्य थांबवण्यास सांगितले होते. फुले घराण्याचे अस्पृश्यना शिकवणे त्यांना मदत करणे धर्माच्या विरुद्ध आहे असे ते म्हणत.

शाळेत जाताना कोणी अंगावर कचरा टाकत तर कोणी शेणाची घाण टाकत असे. इतक्या यातना देऊनही सावित्रीबाईंनी आपले काम थांबवले नाही. उलट सावित्रीबाईंचा धाडसीपणा पाहून भट्टाबामनांची बोलती बंद झाली होती.

Leave a Comment