शिक्षकांच्या निरोपसमारंभासाठी उत्कृष्ट आणि हृदयाचा ठाव घेणाऱ्या 4 भाषणांचा संग्रह. सरांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेऊन त्यांच्या प्रति आदर, कृतज्ञता व्यक्त करणारी भाषणे.
सेवानिवृत्ती निरोप समारंभ भाषण मराठी pdf
भाषण 1
गेली कित्येक वर्षे तन-मन-धन अर्पण करून ज्ञानदानाचे कार्य करणारे आपले जेष्ठ सहकारी श्री माने सर/मॅडम आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या या निरोपाच्या या सोहळ्यात मी माझे मनोगत व्यक्त करत आहे.
सन्माननीय व्यासपीठ, आजचे सत्कारमूर्ती, माननीय अध्यक्ष, सहकारी शिक्षक बंधू भगिनींनो, आणि विद्यार्थी मित्रांनो.
आज ना उद्या आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात निरोप घेण्याची वेळ येते. ही निरोपाची वेळ कोणालाही टाळता येत नाही.
या वेळेला आनंदाने स्वीकारावं लागतं. आजचा निरोप समारंभाचा कार्यक्रम अविस्मरणीय आठवणींचा सोहळा ठरेल असे मला वाटते.
आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती श्री माने सर/मॅडम यांनी आपल्या शाळेला फार मोठ्या काळाची ज्ञानदानाची मोठी सेवा अर्पण केली.
शैक्षणिक क्षेत्रात कार्य करत असताना सरांनी आपल्या संस्थेचे नाव मोठे केले. सामाजिक शैक्षणिक कार्यात सरांचे फार मोठे योगदान आहे.
आपल्या संस्थेला शाळेला असे उत्तम व्यक्तिमत्व लाभणे ही आपल्या सर्वांसाठीच मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे.
सरांच्या प्रत्येक कार्यातून सरांची आपल्या शाळेविषयी शिक्षणाविषयी असलेली ओढ कायम दिसून येते. सरांनी आपल्या शिकवणीतून विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी चांगले प्रयत्न केले.
आज त्यांचे असंख्य विद्यार्थी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील मोठमोठ्या पदावर काम करत आहेत. त्यांच्या विद्यार्थ्यांपैकी समाजात कोणी डॉक्टर, इंजिनियर, सरकारी अधिकारी, सरकारी कर्मचारी म्हणून वावरत आहेत.
आजचा हा सरांचा निरोप समारंभ सोहळा त्यांच्या प्रति कृतज्ञता सोहळा आहे असे मला वाटते. सरांच्या शिकवणीतून सरांचे अध्यापन कौशल्य, विषयावरील प्रभुत्व आणि विद्यार्थ्यांसाठी असलेली आत्मीयता नेहमी दिसून येते.
सरांनी आपले काम एक सामाजिक जबाबदारी, नैतिक जबाबदारी आणि शैक्षणिक जबाबदारी समजून पार पाडले.
सरांच्या बोलण्यातून सरांच्या सहवासातून नेहमी प्रेम व दयाळूपणा दिसून येतो. नाती कशी जपावीत आपलेपणा काय असतो हे सरांकडून शिकून घ्यावं.
माझ्या जीवनातील काही वर्षे मलाही सरांचा सहवास, मार्गदर्शन व प्रेम मिळाले, यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. सरांसारखी माणसे भेटणे भेटणे म्हणजे दुर्मिळ हिरा मिळाल्यासारखेच आहे.
शाळा संस्था म्हणजे केवळ दगड विटांची इमारत नव्हे तर शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी व कर्मचारी हे शाळेचा व संस्थेचा खरा आत्मा आहेत.
सरांच्या अमूल्य कार्यासाठी सर्व शिक्षक सहकारी, विद्यार्थी सरांचे सदैव ऋणी राहतील.
सर निवृत्त होणार आहेत हि बाब आमच्यासाठी जणू दुःखाचा डोंगरच आहे. पण काय करणार शेवटी निसर्गाचे नियम सर्वांना पाळावेच लागतात.
सरांच्या निवृत्तीनंतर सरांची उणीव कायम जाणवत राहील. आपल्या सेवाकाळात सरांनी स्वतःच्या आवडी निवडी बाजूला ठेवून ज्ञानदानाचे काम अविरतपणे चालू ठेवले.
स्वतःचे आरोग्य जपता आले नाही, नातेवाईक, मित्र परिवाराला वेळ देत आला नाही.
सेवानिवृत्तीनंतर सरांसाठी ही वेळ अमूल्य असणार आहे. सरांचे सेवानिवृत्तीनंतरचे संपूर्ण आयुष्य उत्तम आरोग्य, सुख समाधानाचे जावो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना.
कार्यक्रमाच्या आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद!
भाषण 2
आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो.
ज्यांना आपण निरोप देत आहोत असे आदरणीय माने सर/मॅडम आज आपण एकत्र कर्तव्यदक्ष आणि समर्पित शिक्षकांना निरोप देण्यासाठी येथे जमलो आहोत.
सरांनी अनेक वर्षे ज्ञानदानाचे कार्य बजावले आणि विद्यार्थ्यांच्या शाळेच्या भवितव्यासाठी मोलाचे योगदान दिले.
सरांनी उत्तम अध्यापन करून शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थी जीवनातील शिस्तबद्धता आणि जबाबदारी यांचे उत्तम उदाहरण घालून दिले. त्यांच्या या कार्यामुळे विद्यार्थ्यांचे जीवन घडण्यास व शाळेची प्रगती होण्यास मोठी मदत मिळाली.
आजच्या या क्षणी आम्ही सरांचे/मॅडमचे मनःपूर्वक आभार मानतो आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. त्यांचा हा नवा प्रवास आनंदाचा आणि सुख समृद्धीचा असो हीच देवाकडे प्रार्थना. धन्यवाद!
भाषण 3
विद्यार्थी जीवनाचा नंदादीप आयुष्यभर तेवत ठेवण्यासाठी आयुष्य समर्पित करणारे, इतरांच्या सुखदुःखात सदैव सोबत असणारे म्हणजेच आपले सर्वांचे लाडके सर आज प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. आज त्यांचा निरोप व सदिच्छा समारंभ.
आजचा दिवस मंगल मांगल्याचा, ज्ञान यात्रेला मार्ग दाखवणाऱ्या सुवर्ण स्तंभाचा
बापासारखे कठोर होऊन आम्हास शिस्त लावणारे, प्रसंगी आईसारखे माया लावणारे सरांनी सर्वांना सढळ हाताने मदत केली.
शाळेच्या सर्वांगीण विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे. शाळेत विद्यार्थ्यांच्या शिक्षक सहकाऱ्यांच्या हितासाठी विविध सोयी सुविधा निर्माण करताना त्यांनी वेळ काळ पाहिला नाही.
सदैव शाळेच्या विद्यार्थ्यांच्या कल्याणाविषयी सरांनी विचार केला. आम्हा विद्यार्थ्यांवर माया लावली. आदरणीय सर आम्ही परिस कधी पाहिला नाही परंतु सर तुमच्या सहवासामुळे तुमच्या ज्ञानामुळे आमच्या जीवनाचे सोने झाले.
आजच्या या क्षणी आम्ही सरांचे आभार मानतो त्यांना या पुढील आयुष्य सुख समाधानाचे उत्तम आरोग्याचे जावो हीच देवाकडे प्रार्थना करतो. एवढे बोलून मी माझे दोन शब्द थांबवतो. धन्यवाद!
भाषण 4
आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो
मनान मोठे, बोलण्यात आपुलकी, वागणे जबाबदार आणि उत्तम नेतृत्व
असा सर्व समावेशक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आपले आदरणीय सर. आज सरांचा निरोप व सदिच्छा समारंभ.
निरोपाचा क्षण जणू नाजूक त्या फुलांचा, आठवणींचा उजाळा जणू क्षण हा निरोपाचा!
आदरणीय सर म्हणजे एक प्रखर व्यक्तिमत्व, उत्तम संघटन शैली आणि आदर्श शिक्षक अशा अनेक भूमिका साकारणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व.
गेल्या अनेक वर्षात शाळेच्या जडणघडणीत सरांचा मोलाचा वाटा आहे. सर आम्हा विद्यार्थ्यांच्या नेहमीच पाठीशी राहिले.
सरांनी आम्हास खूप काही दिले ज्याचे उपकार फिटने आम्हाला अशक्य आहे. सर आपले कार्य सदैव आम्हास प्रेरणा व बळ देत राहील.
सर तुम्ही आज निवृत्त जरी झाला तरी तुम्हाला प्रतिभेचे पंख फुटतील अशी आशा करतो. तुमचे पुढील जीवन सुखी आनंदी आरोग्यदायी ठरो हीच प्रार्थना. धन्यवाद!