मेंढी पालन माहिती | Mendhi Palan Mahiti Marathi

भारत देश मेंढी उत्पादनात जगात चौथ्या क्रमांकावर आहे. दरवर्षी हजारो टन लोकरीचे तर मेंढीच्या मटणाचे उत्पादन होते. दरवर्षी मेंढ्यांची हजारो कातडी भारतातून मिळतात.

मेंढी लोकर, मांस, लेंडीखत, कातडी असे बहू उत्पादन देणारा पशु आहे यामुळे अनेक पशुपालक मेंढीपालनाला प्राधान्य देत आहेत.  

या पोस्टमध्ये मेंढी पालन कसे करावे (Mendhi Palan) मेंढी विषयी माहिती यावर सविस्तर लेखन केले आहे.

मेंढीपालनाची पारंपारिक पद्धत

मेंढीपालनाची पारंपारिक पद्धत

महाराष्ट्र राज्यात मुख्यत्वे धनगर समाज मेंढीपालन मोठ्या प्रमाणात करतो. आजही धनगर समाज या व्यवसायात व्यस्त असलेला पाहायला मिळतो.

या व्यवसायातील नफा पाहता इतर समाजातील लोक देखील या व्यवसायात उतरलेले आहेत.

पूर्वीचे मेंढी पालक, मेंढी पालन वर्षभर घराबाहेर राहून करत असत. माळरानावर मिळणारा चारा गवत झाडाझुडपांचा पाला मेंढ्यांना चारून त्यांचे संगोपन करत.

मेंढ्यांच्या चाऱ्याच्या शोधात तो घराबाहेर पडत असे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील बांधांचे गवत, पिकांचे अवशेष, पालापाचोळा चारत असे आणि संध्याकाळी त्याच शेतकऱ्याच्या शेतात पाल ठोकून मुक्काम करत असे.

कधी चारी बाजूंनी काठ्यांच्या साहाय्याने जाळी उभी करून त्यांना बंदिस्त केले जात असे. तर रात्रभर उघड्यावर बसवून आळीपाळीने जागून मेंढ्यांचे संरक्षण केले जात असे. ही पूर्वीची मेंढीपालनाची पारंपरिक पद्धत मानली जात होती.

सध्या मेंढीपालक खूप हुशार झाला आहे. त्याला आता बाजारपेठ, व्यवहार कळू लागले आहेत. नवे तंत्रज्ञान माहिती झाले आहे त्यामुळे तो सध्या बंदिस्त अर्ध बंदिस्त मेंढीपालनाकडे वळला आहे. स्वतःच्याच शेतात चारा निर्मितीकडे तो लक्ष देऊ लागला आहे.

मेंढीच्या जाती

मेंढ्या प्राण्यांचं वास्तव्य पूर्वी थंड हवामान असलेल्या ठिकाणी होतं. परंतु जसा काळ लोटत गेला तशा त्या जगाच्या सर्व भागात जाऊन पोहोचल्या. आता त्यांनी त्या त्या भागातील हवामानाशी जुळवून घेतल आहे.

बिकानेरी, दख्खनी, बेलारी, हिस्सारडेल, लोही, काठेवाडी, दमानी, जालानी, थाल, बेलोरी, भाकरवाल, राक्षणी, रामपुरी, जैसलमेरी आणि संकर इत्यादी मेंढ्याच्या प्रमुख जाती आहेत.

मेंढ्यांचे खाद्य व पाणी व्यवस्थापन

मेंढ्यांचे खाद्य व पाणी व्यवस्थापन

मेंढी हा प्राणी गवत व झाडपाला खाणारा प्राणी आहे. तिच्या वाढीसाठी आवश्यक सर्व जीवनसत्वे तिला गवत व झाडपाल्यापासून मिळतात.

जर आपण बंदिस्त, अर्ध बंदिस्त मेंढी पालन करणार असाल तर त्यांच्या वाढीसाठी शेतीतील गवत, घास, ओली किंवा वाळलेली वैरण, दुकानात मिळणारे पशुखाद्य यांचा वापर खाद्य म्हणून करता येतो.

मेंढीने खालेला चारा व खाद्य व्यवस्थितरित्या पचवण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते.

एका मेंढीला रोज सरासरी पाच लिटर पाण्याची आवश्यकता असते. तिला पिण्यासाठी ठेवलेले पाणी स्वच्छ चवीला चांगले असावे. दुषित पाणी मेंढीला पाजू नये.

हे वाचा:
दुग्ध व्यवसाय माहिती
देशी कोंबडी पालन माहिती

मेंढी पालनासाठी मेंढ्यांची निवड

शक्यतो जलद वाढ असणाऱ्या, स्थानिक हवामानाशी जुळवून घेणाऱ्या मेंढ्यांची निवड करावी. निकृष्ट दर्जाच्या आजारी मेंढ्या खरेदी करणे टाळावे. सुरुवातीला वीस मेंढ्या एक नर किंवा दहा मेंढ्या एक नर घेऊन सुरुवात करावी.

प्रजननासाठी ठेवलेला नर कसा असावा

प्रजननासाठी निवडलेला नर हायब्रीड नसावा. तो जातिवंत असावा. जितके तो खाद्य खाईल तितके त्याच्या अंगाला लागावे.

चरबीचे प्रमाण कमी असलेल्या नराची निवड करावी. त्याचे वय किमान दोन वर्ष असावे. शरीर कसदार असावे.

मेंढ्यांचे शेड

मेंढ्यांचे शेड मजबूत असावे. हवा खेळती राहील असे असावे. शेडच्या वरती सिमेंटचा पत्रा मारावा. चारी बाजूने तारेची जाळी मारावी. दररोज शेड साफ करावे.

शेडमध्ये स्वच्छ पाणी ठेवावे. मेंढ्यांना आत मध्ये उठता बसता येईल फिरता येईल इतकी जागा मोकळी ठेवावी. भटकी कुत्री, जंगली प्राणी यांना शेडमध्ये प्रवेश करता येणार नाही असे शेड करावे.

रात्रीच्या वेळी शेडचे दार चांगले बंद करावे. शेडवर मेंढ्या आणण्यापूर्वी शेडची साफसफाई स्वच्छ पाण्याची सोय अगोदर करून ठेवावी.

मेंढ्यांचे आरोग्य व्यवस्थापन

मेंढ्यांचे आरोग्य व्यवस्थापन

मेंढी आजारी असण्याची लक्षणे आढळून आल्यास पशुवैद्याकडून औषध उपचार करावेत. आजारी मेंढ्यां कळपातून बाजूला कराव्यात. यामुळे इतर मेंढ्यांमध्ये रोगांचा प्रसार होणे टाळता येते.

खराब चारा व पाणी यातून रोगांचा प्रसार होत आहे असे लक्षात आल्यास त्वरित तो मेंढ्यांना खाऊ घालणे थांबवावा.

मेंढ्यांना देवी, घटसर्प, धनुर्वात, टीबी, आंत्रविषार, लाळ्या खुरकूत यांसारखे गंभीर आजार होऊ नये म्हणून पशुवैद्याकडून लसीकरण करून घ्यावे.

विक्रीकरिता बाजारपेठ

बोकडाच्या मांसापेक्षा मेंढीचे मांस चवदार असते. जे लोक इतर प्राण्यांचे मांस खात नाहीत अशा ग्राहकांसाठी मेंढीचे मांस हे एक पर्यायी मांस ठरत आहे.

स्थानिक आठवडे बाजारांमध्ये मेंढ्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होत असते. त्यामुळे मेंढ्या विकण्याकरिता एक वेगळी बाजारपेठ शोधण्याची गरज पडत नाही. आजकाल स्थानिक तरुण देखील या व्यवसायात उतरले आहेत.

मेंढी पासून आपल्याला काय मिळते

मेंढ्यांपासून लोकर, लेंडी खत व कातडी मिळतात. मेंढ्यांच्या लोकरचा उपयोग गरम उबदार कपडे बनवण्याकरता केला जातो.

आहारामध्ये मेंढीच्या मांसाचा समावेश प्रथिनांची गरज भागवण्याकरता केला जाते. स्थानिक शेती करता लेंडी खत वापरले जाते.

मेंढ्यांच्या कातड्यांचा वापर कातडी वस्तू बनवण्याकरता केला जातो. मेंढीची लोकर आणि लोकरीपासून तयार केलेल्या वस्तूंना देशात व परदेशात मोठी मागणी आहे. दरवर्षी या वस्तूंच्या परदेशी विक्रीतून भारताला करोडो रुपये परकीय चलन मिळते.

मेंढ्या खरेदी गुंतवणूक

10 मेंढ्या 1 नराने सुरुवात

1 मेंढी किंमत 17,000

10 मेंढ्या किंमत 1,70,000

1 नर किंमत 20,000

एकूण गुंतवणूक = 1,90,000

20 मेंढ्या 1 नराने सुरुवात

1 मेंढी किंमत 17,000

20 मेंढ्या किंमत 3,40,000

1 नर किंमत 20,000

एकूण गुंतवणूक = 3,60,000

पक्के शेड बांधकाम खर्च

पक्के शेड बांधकाम खर्च

कमीत कमी खर्चात जर 21 मेंढ्याचे साधे शेड उभे करायचे असेल तर 2 लाख रुपये सरासरी खर्च येऊ शकतो.

खुराक खर्च

प्रत्येक मेंढीला वर्षाला 60 किलो खुराक लागतो. हा खुराक तुम्ही मका, गहू, यांसारखी धान्ये व पेंड यातून भागवू शकता.

मेंढीपालनातून मिळणारे वार्षिक उत्पन्न

प्रत्येक मेंढी वर्षाला दोन कोकरांना जन्म देते. जर तुमच्याकडे 20 मेंढ्या असतील तर 20 मेंढ्यांची ४० कोकरे होतात.

एक कोकरू ६ ते ८ महिन्यात ३० किलो वजनाचे बनते. ६ ते ८ महिन्याचे कोकरू बाजारात सरासरी 12 हजारापर्यंत विकले जाते.  ४० कोकरांच्या विक्रीतून 4, ८०,००० मिळतात.

मेंढीपासून मिळणारे लेंडी खत

एका मेंढीपासून वर्षाला 500 ते 600 किलो लेंडी खत मिळते. वर्षाला 20 मेंढ्या व १ नराचे लेंडी खत १२६०० किलो मिळते.

मेंढीपासून मिळणारी लोकर

एका मेंढीपासून वर्षाला 680 ग्रॅम लोकर मिळते. या ठिकाणी २१ मेंढ्याची लोकर 14 किलो मिळणार आहे. बाजारात मेंढीच्या लोकरीला सरासरी दर १५० ते 200 रुपये प्रति किलो मिळतो. या ठिकाणी १४ किलो लोकरीचे २१०० ते २८०० रुपये मिळतील.

Conclusion (निष्कर्ष)

मेंढीपालन व्यवसायात कष्ट आहे. परंतु फायदा सुद्धा तितकाच आहे. मेंढ्या माळरानावर चारायला घेऊन जाणार असाल तर दिवसभर मेंढ्याच्या मागे फिरावे लागणार आहे.

आणि जर अर्धबंदिस्त, बंदिस्त मेंढीपालन करणार असाल तर त्यासाठी शेतात चारा पिकवावा लागेल.

भांडवलाच म्हणाल तर छोट्या छोट्या मादी मेंढ्या बाजारातून खरेदी करून सुरुवात करता येईल.

ज्या पशुपालकांना कमी कष्टात, कमी भांडवलात पशुपालन व्यवसाय सुरु करायचं आहे त्यांच्यासाठी मेंढीपालन अगदी उत्तम पर्याय आहे.

FAQ

मेंढीच्या पिल्लाला काय म्हणतात

मेंढीच्या पिल्लाला कोकरू असे म्हंटले जाते.

मेंढीच्या घराला काय म्हणतात

मेंढीच्या घराला “गोठा” असे म्हणतात.

मेंढी च्या जाती

बिकानेरी, दख्खनी, बेलारी, हिस्सारडेल, लोही, काठेवाडी, दमानी, जालानी, थाल, बेलोरी, भाकरवाल, राक्षणी, रामपुरी, जैसलमेरी आणि संकर इत्यादी मेंढ्याच्या प्रमुख जाती आहेत.

Spread the love

Leave a Comment