मत्स्य पालन व्यवसाय मराठी माहिती | How to Start Fish Farming Business in Marathi

रोजगार, परकीय चलन व आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याच्या हेतूने मत्स्य व्यवसाय करणे फायद्याचे ठरणार आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मत्स्य व्यवसाय हा महत्त्वाचा भाग मानला जातो. मानवाच्या अन्नातील पूरक खाद्य म्हणून माशांना महत्त्व आहे.

शेतीबरोबर जास्तीत जास्त जलसंपत्तीचा वापर करून मत्स्य संवर्धन करणे काळाची गरज आहे. उत्पन्नाचा दुसरा मार्ग म्हणून मत्स्य व्यवसाय करणे योग्य ठरणार आहे.

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्याला अफाट नैसर्गिक साधन संपतीची जोड असल्यामुळे मत्स्यपालनाला महाराष्ट्रात चांगली संधी आहे.

सुदैवाने महाराष्ट्र राज्याला 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. 1, 11, 512 चौरस किलोमीटर सागरी खंड उतारा क्षेत्र लाभलेले आहे तर 600 किलोमीटर नदी पात्र लाभलेले आहे.

ही भौगोलिक संपदा मत्स्य व्यवसायासाठी अनुकूल आहे. कोकणासह राज्यातील इतर भागात हा उद्योग यशस्वीपणे करता येऊ शकतो.

केरळ, गोवा, वेस्ट बंगाल, मणिपूर, आसाम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मासे खाल्ले जातात.

या राज्यात राहणाऱ्या लोकांचे मासे हे प्रमुख अन्न आहे.

मत्स्य व्यवसायासाठी माशांच्या प्रमुख जाती

मत्स्य शेतीसाठी, मत्स्य व्यवसायासाठी लवकर वाढ होणाऱ्या माशांच्या जातींची निवड करावी. कटला, रोहू, चंदेरा, मृगळ आणि सायप्रीनस इत्यादी महत्त्वाच्या माशांच्या जाती जलद गतीने वाढणाऱ्या आहेत. कटला

कटला माशांची वाढ लवकर होते. या माशाला बाजारात चांगली किंमत आहे. एका वर्षात हा मासा वजनाने दीड ते दोन किलो भरतो.

या माशांचे संवर्धन करण्यासाठी कमीत कमी साडेचार फिट ते सात फिट पाण्याची खोली असावी लागते.

अशा पाण्यामध्ये कटला माशांची चांगली वाढ होते. गढूळ पाण्यामध्ये कटला माशांची चांगली वाढ होत नाही.

रोहू

हा मासा वर्षभरात वजनाने एक ते दीड किलो भरतो. एका वर्षात हा मासा मॅच्युअर होतो. रोहू मासा कटला या माशांपेक्षा थोडासा कमी गतीने वाढणारा मासा आहे.

मृगळ

वर्षभरात 500 ते 750 ग्रॅम इतकी वाढ होते.

मरळ मासा (Snake head fish)  

फिट अँड फाईन ठेवणारा मासा म्हणून या माशाची ओळख आहे. हा मासा आरोग्यविषयक अनेक तक्रारी दूर करणारा मासा आहे.

मराठवाड्यातल्या नद्यांमध्ये हा मासा मोठ्या प्रमाणात सापडतो. आठ ते नऊ महिन्यांमध्ये मरळ मासा एक किलो वजनाचा होतो.

रंगीत माशांचा उद्योग

मुंबई, पुणे, कोलकाता व चेन्नई सारख्या शहरात घरामध्ये शोभिवंत माशाचे एक्वेरियम फिश टॅंक पाहायला मिळतात. मोठ्या व लगतच्या शहरांमध्ये असे अनेक ग्राहक आहेत.

जे आपल्या घरामध्ये काचेच्या टॅंकमध्ये रंगीत माशांचे संगोपन करतात. रंगीत माशांचे घरांमध्ये संगोपन करणे हा एक छंद आहे.

मत्स्य व्यावसायिकांसाठी रंगीत माशांचे संवर्धन करणे एक व्यावसायिक संधी आहे. देशांतर्गत बाजारपेठेत या व्यवसायातून 50 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल झालेली आढळते, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जवळजवळ 200 कोटीची उलाढाल झालेली आढळते.

मत्स्यबीज कुठून खरेदी करावे

मत्स्य व्यवसायासाठी आवश्यक मत्स्यबीज बाहेरच्या राज्यातून न मागवता ते महाराष्ट्रातील मत्स्यबीज केंद्रातून मागवावे.

बाहेरच्या राज्यातील पाण्याचा पीएच, मातीचा पीएच वेगळा राहतो व महाराष्ट्रातील मातीचा व पाण्याचा पीएच वेगळा राहतो.

जर महाराष्ट्रातील पाण्यात वाढलेल्या मत्स्यबीजांचा मत्स्य व्यवसायासाठी वापर केल्यास त्यांचा survival rate सुद्धा चांगला येतो.

मत्स्यबीज महाराष्ट्रातील असल्यामुळे त्यांचा महाराष्ट्रातील वातावरणाशी जुळवून घेण्याचे गुणधर्म वाढतात. म्हणजेच माशांची मरतुक फार कमी होते.

मत्स्य बिजाची निवड करणे

बाजारपेठेत मागणी असणाऱ्या माशांचीच व्यवसायासाठी निवड करावी. तसेच जलद गतीने कमी वेळेत वाढणाऱ्या माशांची निवड करावी.

शेततळ्यातील मत्स्य व्यवसाय

शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शेततळ्याची बांधणी केली जाते. अशी अनेक शेततळी वर्षभर पाण्याने भरलेले असतात.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जर मत्स्य पालन करून आर्थिक नफा मिळवायचा असेल तर शेततळ्यांचा मत्स्यपालनासाठी वापर करता येतो.

शेततळ्यातील पाण्याचा व मातीचा पीएच तपासून घ्या, त्यानुसार माशांच्या जातींची निवड करता येते. ग्रामीण भागातील शेततळ्यामध्ये चिलापी, सुरमई व कटला या जातीचे मासे मोठ्या प्रमाणात पाळले जातात.

शेततळ्यातील माशांचे मासे खाणाऱ्या पक्षांपासून संरक्षण

शेततळ्यामध्ये मत्स्य पालन करत असताना मच्छी व्यवसायिकांना मासे खाणाऱ्या पक्षांचा खूप त्रास होतो.

पानकावळे पानकोंबडे यांसारखे पक्षी शेततळ्यामध्ये डुबकी घेऊन मत्स्य बीज खाण्याचे काम करतात.

या पक्षांपासून मत्स्य बिजांचे संरक्षण करण्यासाठी पाण्यावर डोक्याच्या उंचीइतकी bird net लावावी. जेणेकरून पानकावळे, पक्षी तळ्यातील मासे खाण्यासाठी जाळीच्या आत येणार नाहीत.

गोड्या पाण्यातील मासे पालन

नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांमध्ये मत्स्यपालन करता येते. तसेच मानवनिर्मित शेततळ्यांमध्ये मत्स्यपालन करता येते.

ग्रामीण भागात गावतळी पाहायला मिळतात तसेच शेतकऱ्याने आपल्या शेतात शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे या हेतूने शेततळी बांधली आहेत.

तर अशा प्रकारच्या पाण्यामध्ये यशस्वीरित्या मत्स्य पालन करता येते.

गोड्या पाण्यात मच्छी पालन करताना गावतळी किंवा शेततळ्यांमध्ये मत्स्यबीज सोडले जाते. तसेच त्यांची लवकर वाढ होण्याकरता त्यांना उत्तम प्रतीचे खाद्य दिले जाते व अनुकूल परिस्थिती निर्माण केली जाते.

तलावातील माशांची विक्रीयोग्य वाढ झाल्याचे तपासून ते मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवले जातात. माशांच्या जातीनुसार माशांचे दर वेगवेगळे आहेत.

मिश्र मत्स्य पालन

पाण्यातील सर्व नैसर्गिक अन्नाचा वापर व्हावा या हेतूने मिश्र मत्स्यपालन फायद्याचे ठरते.

देशात कटला, रोहू व मृगळ या तीन कार्प जातींचा सर्रास वापर केला जातो.

मृगळ व सायप्रीनस तळ भागातील खाद्य खातात.

कटला पाण्याच्या पृष्ठभागावरील तर रोहू मासे पाण्याच्या मधल्या पातळीतील अन्न खातात. मत्स्यपालनात भरघोस उत्पन्न मिळवण्यासाठी माशांना पूरक खाद्य द्यावे.

पाण्याच्या गुणवत्तेचे महत्त्व

मासा हा पाण्यात राहणारा जीव आहे, त्यामुळे पाणी हेच त्याचे सर्वस्व आहे. मासे पाण्याशिवाय क्षणभर ही जगू शकत नाहीत.

माशांचे आरोग्य व माशांची वाढ ही पाण्याच्या गुणवत्तेवर व सभोवतलच्या वातावरणावर अवलंबून असते.

उत्तम व यशस्वी मत्स्य व्यवसाय करण्याकरिता पाण्याची गुणवत्ता चांगली ठेवणे आवश्यक आहे. मत्स्य व्यवसायांमध्ये पाण्याकडे दुर्लक्ष करणे या व्यवसायात अपयशाला कारणीभूत ठरू शकते.

पाण्याची पारदर्शकता

तलावातील पाणी स्वच्छ असल्यास सूर्याची किरणे पाण्याच्या तळ्यापर्यंत पोहोचतात. सूर्यकिरणे पाण्याच्या तळाशी पोहचल्यामुळे वनस्पती प्लवंग तयार होतात.

प्राणी प्लवंगे माशांचे जिवंत खाद्य आहे, त्यामुळे हे प्राणी प्लवंग वनस्पती प्लवंगावर तयार होतात. माशांना प्राणी प्लवंग खाद्य मिळवण्यासाठी पाण्याची पारदर्शकता कायम ठेवणे आवश्यक आहे.

पाण्यातील गढूळपणा

खोल पाण्यापेक्षा उथळ पाण्यात सूर्यकिरणे लवकर पोहोचतात. पण पाणी जर गढूळ असेल तर सूर्यकिरणे तळाशी पोहोचण्यास अडथळा निर्माण होतो.

थोडक्यात सांगायचे झाल्यास वनस्पती प्लवंगांना प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक असणारी सूर्यकिरणे पोहोचत नाहीत.

खाद्य पुरवठा

मत्स्यपालनात भरघोस उत्पन्न मिळवण्यासाठी माशांना पूरक खाद्य द्यावे.

मासेमारी कधी करावी

पाण्यात मत्स्यबीज सोडल्यानंतर साधारणपणे दहा ते बारा महिन्यात माशांचे वजन एक किलो पर्यंत वाढते, त्यावेळी मासेमारी करण्यास हरकत नाही.

बाजारपेठ

मासेमारी केल्यानंतर विक्रीकरिता मासे शहरांमध्ये आणि स्थानिक भागात आणले जातात.

आसपासच्या परिसरातील तळ्यातून मासेमारी केल्यानंतर ती विक्रीकरता गाव पातळीवर भरल्या जाणाऱ्या बाजारात आणली जातात.

साधारणपणे संध्याकाळी चार वाजल्यानंतर मासे विक्री सुरू होते. सध्या मासे विक्रेत्यांचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे मासे विक्री गावातील मुख्य चौकात, रस्त्याच्या कडेला सुरू असते.

गाव पातळीवर माशांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यातून मासे शहरात रेल्वे मार्गाने पाठवले जातात दूरवर मासे पाठवण्याकरिता शीतपेट्या आवश्यक असतात. शीतपेट्यांमध्ये बर्फ भरलेला असतो त्यामुळे मासे बराच काळ ताजे राहतात.

Spread the love

About Uday Waghmare

Uday Waghmare is the author of this blog. He is passionate about writing in the field of business and is trying his best to provide business-related information in the Marathi language on this blog.

View all posts by Uday Waghmare →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *